slovensky english

Ars Poetica v India Times

Ars Poetica v India Times

Príspevok o svojej účasti na 11. ročníku Medzinárodného festivalu poézie Ars Poetica 2013 v Bratislave napísal aj prestížny indický básnik - Prafull Shiledar. Článok vyšiel v India Times, 8.12.2013 a je napísaný v jazyku Mahárathi. V tomto jazyku zazneli aj jeho básne v Bratislave.

माणसं जोडते कविता!

पूर्व युरोपातील स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लाव्हा येथे 'आर्स पोएटिका' या नावाने भरलेल्या अकराव्या आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सवात यंदा प्रथमच एका आशियाई कवीला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, आणि तो मान तरुण मराठी कवी प्रफुल्ल शिलेदार यांना मिळाला. हा आगळा वेगळा अनुभव त्यांच्याच शब्दात-

कविता नावाची कला जगण्याशी सरळ सरळ नातं ठेवून आपलं रूप हळूहळू बदलत असते. ती आपल्या कवेत मानवी जगण्यासोबतच त्याचा सामाजिक इतिहास, त्याचा परिसर या साऱ्या गोष्टींमधले ताणेबाणे घेत जाते. प्रत्येक समाजाची जशी एक वेगळी जडणघडण असते, त्यानुसार कवितेचं सूक्ष्म रूप बदलत असतं. मात्र स्थूल रूपानं कवितेत मानवी आयुष्याबद्दलचं काही चिंतन, काही सांगणं ‌असतंच. त्यामुळेच कवितेला समाजाच्या आणि देशांच्या सीमा ओलांडूनदेखील दाद मिळत जाते. फक्त कविताच नव्हे तर प्रत्येकच कला ही मानवी जीवनाचा अर्क असते. सुसंस्कृत समाज ही गोष्ट जाणतो त्यामुळे कलेचा उत्सव हा आपल्या आधुनिक जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे.

'आर्स पोएटिका' म्हणजे आर्ट ऑफ पोएट्री. पूर्व युरोपातील स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लाव्हा येथे 'आर्स पोएटिका' या नावाने गेली दहा वर्षे आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सव होतो आहे. यंदा १७ ते २१ ऑक्टोबर २०१३ला झालेला महोत्सव हा अकरावा महोत्सव. या महोत्सवात साधारणतः युरोपियन देशातले कवी सहभागी होत आलेत. बरेचदा अमेरिकन किंवा रशियन कवींनाही आमंत्रित केलं जातं. मात्र भारतीय कवीला आमंत्रित करून त्याला महोत्सवात कवितावाचनासाठी बोलावण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. त्यामुळे भारतातून आलेला कवी म्हणून माझ्याबद्दल काही अपेक्षा होत्या की काय ते माहीत नाही. मात्र उत्सुकता नक्कीच दिसली आणि ती सगळ्यांशी बोलताना जाणवत होती. कविता हाच सगळ्या देशातल्या कवींना एकमेकांबद्दल आत्मीयता वाटून जोडणारा धागा होता.

१७ ऑक्टोबर. काव्यमहोत्सवाचा पहिलाच दिवस. ब्रातिस्लाव्हा फ्लॅगशिप रेस्टॉरंटमध्ये कलत्या दुपारी पाचच्या सुमारास डिनर करता तिथे आलेले सगळे कवी एकत्र जमले. एकमेकांशी ओळख होत गेली. बहुतेक सगळे तरुण वा मध्यमवयीन होते. थोडं गंभीर थोडं उत्साहात बोलणं सुरू होतं. अनेक जण त्या त्या देशातल्या वाङ्मयीन चळवळींसोबत बांधिलकी असणारे होते. काही जणांची स्वतःची प्रकाशनगृहं होती. कुणी मासिकांचे संपादक. कुणी पत्रकार. कुणी वेबमॅगझिनचा एडिटर. कुणी एखाद्या लायब्ररीत वा म्युझियममध्ये नोकरीला. एखादा भाषेचा वा भाषाशास्त्राचा अध्यापक. फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, इंग्लंड, फिनलंड, तुर्कस्थान, पोलंड, चेक रिपब्लिक, क्रोएशिया, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, बल्गेरिया अशा साधारणतः पंधरा देशांतले सुमारे पंचवीसएक कवी आम्ही होतो. त्यात मग काही जणांशी अधिक जवळीक निर्माण झाली. गप्पा रंगू लागल्या. देवाणघेवाण होऊ लागली.

संध्याकाळी सातला कवितावाचन सुरू होणार होतं. त्या आधीच आम्ही कार्यक्रमस्थळी पोहोचलो होतो. गेल्यावर लगेचच आमच्या हाती आम्हा सगळ्या कवींच्या कवितांची स्लोव्हाक भाषेतील अनुवादासह काढलेली सुमारे तीनशेहून अधिक पानांची एक सुंदर अॅन्थॉलॉजी ठेवण्यात आली. खूप आधीपासून योजनाबद्ध रीतीने काम केल्याचा हा परिपाक असावा. माझ्या पाच कविता मराठी, इंग्रजी आणि स्लोव्हाकमध्ये छापलेल्या होत्या. मराठी भाषेतील म्हणजे देवनागरी लिपीतील कविता त्यांनी आवर्जून मागितल्या होत्या. ही भाषा आमच्याकरता एकदम नवी आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्या कविता तुमच्या लिपीतही छापायला आवडेल, असं म्हटल्याने जयप्रकाश सावंतांच्या मदतीने लोकवाङ्मय गृहातून त्या नीट टाइप सेट करून त्यांना पाठवल्या. त्यांनी त्या जशाच्या तशा उचलून त्यांच्या ग्रंथात घेतल्या. त्यांच्या लिपीबद्दलच्या अशा असोशीचं मला खरं सांगायचं तर कौतुकच वाटलं.

माझ्या कवितांचे स्लोव्हाक अनुवाद सिल्व्हिया रूपल्टोव्हाने डॉ. संतोष भूमकरांच्या इंग्रजी अनुवादांवरून केले होते. त्यांचं वाचन स्लोव्हाक रंगभूमीवरचा प्रसिद्ध नट आणि दिग्दर्शक लुबो बुकोव्ही करणार होता. तो आधी येऊन मला भेटला. त्याने स्लोव्हाक अनुवाद समोर ठेवून माझ्यासोबत त्याबाबत चर्चा केली. त्यातले गर्भितार्थ, संदर्भ अशा सगळ्या गोष्टींबाबत समाधान होईपर्यंत तो विचारत होता. काही कवींच्या कविता ल्यूशिया होराजोव्हा ही रंगकर्मी वाचणार होती. तिचंही इतर कवींसोबत बोलणं सुरू होतं.

आयोजनात मुख्य आयोजक 'सिटी काऊन्सिल ऑफ ब्रातिस्लाव्हा' होती. तिथलं सांस्कृतिक मंत्रालय, फिल्म इन्स्टिट्युट, स्थानिक रेडिओ चॅनल असे अनेक जण त्या आयोजनात गुंतले होते. शिवाय देशाबाहेरच्या 'गटे इन्स्टिट्युट', 'पोल्स्की इन्स्टिट्युट', 'यू. एस. एम्बसी' अशा अनेकांचा सहभाग होता. मात्र कार्यक्रमस्थळी कुणाचेही बटबटीत बॅनर दिसत नव्हते.

आपल्याकडच्या एनसीपीएतल्या साधारणतः एक्सपेरिमेंटल थिएटरसारख्या थिएटरमध्ये कवितावाचनाकरता कवी व श्रोते जमले होते. रंगमंचावर कुणीच नव्हतं. सारे श्रोत्यांमध्ये. ठीक सात वाजता आयोजकांपैकी कवी मार्तिन सोलोत्रुक श्रोत्यांमधून उठला आणि रंगमंचावर येऊन महोत्सवातल्या पहिल्या कवीचा थोडक्यात परिचय करून देत त्याला आमंत्रित करून परत श्रोत्यांमध्ये आला. रंगमंचाच्या उजव्या हाताला कवितांचे स्लोव्हाक अनुवाद वाचणारे लुबो आणि ल्यूशिया बसले होते. कवीची एक कविता वाचून झाली की आपल्या कमावलेल्या आवाजात स्लोव्हाक भाषेत ते अनुवाद सादर करायचे तेव्हा श्रोते टाळ्या वाजवून पसंती दर्शवत असत.

आयोजकांपैकी एका वेगळ्या टीमने प्रत्येकाच्या कवितांवर आधारित मूर्त वा अमूर्त व्हिजुअल्स तयार केली होती. कवी कविता वाचत असताना मागे प्रचंड पडद्यावर ती दाखवली जात होती. त्याचा एक वेगळाच परिणाम कविता ऐकताना होत होता. दुसऱ्या दिवशी तर गेरार्ड फॉकनर या जर्मन कवीच्या कवितावाचनासोबत एक अप्रतिम अॅनिमेटेड फिल्म दाखवली गेली. त्या कवितेचा आशय साधारणतः सत्तांतर व त्यामुळे होत जाणारे सामान्य माणसाच्या जगण्यातले बदल असा होता. फिल्म कवितेचा परिणाम फारच गडद करत होती. पहिल्या दिवशी इव्हान आणि नेव्हेना (बेल्जियम), स्टीव्हन फॉलर (ब्रिटन), पीटर रेझ (हंगेरी), मरियानो पेराऊ (स्पेन), हेलेना सिनर्व्हो (फिनलंड) यांनी आपल्या कविता वाचल्या. या दिवशीच्या कवितावाचनाचा समारोप माझ्या कवितावाचनानं झाला. मी इंग्रजी अनुवाद वाचले. मात्र एक कविता आवर्जून मराठीत वाचली. माझ्या भाषेचा ध्वनी त्या तिथे युरोपातल्या कवींसमोर आणि श्रोत्यांसमोर उच्चारताना एक वेगळीच भावना मनात येत होती. माझ्या भाषेतलं माझं जग या सगळ्यांना किती अपरिचित आहे, पण किती एकाग्रपणे सगळे हे जग निरखत आहेत. काय शोधत असतील हे माझ्या कवितेत? काही सापडेल काय त्यांना त्यात त्यांना जवळचं वाटणारं?

माझी एक कविता वाचून झाली की लुबो तिचा स्लोव्हाक अनुवाद वाचायचा, तेव्हा मी रंगमंचावर शांतपणे उभा राहून त्या खर्जातल्या आवाजातले अनाकलनीय पण भावपूर्ण ध्वनी ऐकत समोरच्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया निरखत होतो.

माझ्या कवितावाचनासोबतच पहिल्या दिवशीचं कवितावाचन संपलं. नंतर थोडासा ब्रेक आला. त्यानंतर तिथल्या कलावंतांचा तासभराचा संगीताचा कार्यक्रम झाला. स्लोव्हाक संगीत जाझला जवळचं. रफ आणि टफ. श्रोते मजेत माना डोलवीत ठेक्यावर पाय नाचवत होते. ते झाल्यावर लागूनच असलेल्या लाऊंज पबमध्ये सगळ्यांसोबत गप्पा. कवितावाचनाबद्दल प्रतिक्रिया. आयोजक संस्थांचे प्रतिनिधी तिथे सहभागी झालेले. उत्तररात्रीपर्यंत गप्पा. मग उत्तरोत्तर रात्री शहरातून पायी भटकत गप्पा मारत दानुब नदीच्या काठाकाठानं आम्ही राहत असलेल्या जहाजाकडे परत जाणं. तिथे पुन्हा डेकवर एक पहाटेपूर्वीची मैफल रंगे. महोत्सवाचे चारही दिवस साधारणतः असाच दिनक्रम. दुपारी मात्र काही ठिकाणी भेटी. कधी राऊंड टेबल डिस्कशन. एके दुपारी आयोजकांनी कलाशाखेच्या काही विद्यार्थ्यांसोबत ब्रातिस्लाव्हा शहरातील महत्त्वाच्या आर्ट गॅलरीजना भेटीचा कार्यक्रम आखला होता. झेकोस्लोव्हाकियात चित्रकला, एकीकडे रशियन चित्रकलेचा प्रभाव आणि दुसरीकडे पश्चिम युरोपातील दिग्गज चित्रकारांची प्रभावळ अशा परिस्थितीत कशी वाढत गेली याचं चांगलं चित्र उभं झालं. त्या छोट्याशा टुमदार आणि शांत गावात राजधानी असल्याची कुठलीच लगबग वा धावपळ जाणवत नव्हती. अत्यंत शांत, संथ आणि रेखीव जीवन सुरू असलेलं दिसलं. मात्र बोलण्यातून जेव्हा स्थानिक लोक मोकळे होत जातात तेव्हा एका बाजूला स्टालिनच्या काळातील काळ्या दिवसांमुळे अतिरेकी डावेपणाबद्दल घृणा तसंच वाढत्या अमेरिकन कंपनीकरणाबद्दल तिटकारा अशा दोन्ही गोष्टी खदखदत असलेल्या जाणवतात. महायुद्धाचे फटके सोसलेल्या या देशांना पुढेही अनेक राजकीय उलथापालथींना सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर त्यांना आपलं सार्वभौमत्व आणि शांतता, या दोन्ही गोष्टी हव्या आहेत आणि त्या जपण्याचा ते प्रयत्न करताना दिसतात.

असं म्हटलं जातंय की युरोप, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया या भागांतून आता जागतिक श्रेष्ठ साहित्य न येता ते लॅटिन अमेरिका आणि आशियातून येईल. लॅटिन अमेरिकन साहित्याने तर जगावर आपला प्रभाव टाकायला सुरुवात केलेली आहेच. आशियातील साहित्य अजूनही भाषांतरित होण्याच्या पायरीवरच अडखळतं आहे. युरोप, अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या आशियाई लेखकांची एक मोठी फळी बेस्टसेलर्सच्या यादीत जाऊन बसली आहे. पण मी ज्यांना भेटलो, त्या माझ्या समकालीन युरोपियन लेखक-कवींची मनःस्थिती काय आहे याचा ‌अंदाज लावता येऊ शकत होता. मला वाटतं, सध्या जगात एवढी मोठी उलथापालथ आणि सरमिसळ सुरू आहे की त्यामुळे कुणी एकदम थोर होत नाहीय. एका बाजूने स्थानिक वैशिष्ट्यांचा लोप होत सामान्यीकरणाची प्रक्रिया वेग घेत आहे. दुसरीकडे जागतिक सरमिसळीमुळे जीवनमूल्यांचं मोठ्या प्रमाणावर वक्रीकरण होत आहे. जीवनमूल्यांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार आणि प्रवास होतो आहे. त्यामुळे एक प्रकारची सांस्कृतिक गोंधळाची स्थिती जगभर निर्माण झालेली दिसून येते. प्रत्येकच देशावर कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या देशाचा प्रभाव पडतो आहे. कुठल्या तरी देशात दुसरा कुठलातरी देश घुसखोरी करतो आहे. कुणी आपले हस्तक सत्तास्थानी आणतो आहे. कुणाची शकलं होत आहेत. तेव्हा सर्वसामान्य माणूस संभ्रमित अवस्थेत असताना लेखकाला काळाची नस बरोबर सापडता येणं गरजेचं आहे. लेखकासमोरचा हा सगळ्यात कठीण आणि कसोटीचा क्षण असतो. या सगळ्या गोष्टींची जाणीव तिथे दिसत होती.

काव्यमहोत्सवात कवितेकडे वेगवेगळ्या अंगाने पाहिलं गेलं. स्विस कवयित्री हेईक फिडलरने तर तिच्या कवितांचं मल्टिमिडिया सादरीकरण केलं. आपल्या कवितांची विशिष्ट प्रकारे मांडणी करून अक्षरं आणि शब्दांची रचना, त्याचा संगणकाच्या साहाय्याने पडद्यावर विशिष्ट क्रम लावून वा रचनातंत्राचा वापर करून तिनं परिणामकारक सादरीकरण केलं. त्याचप्रमाणे कवितावाचनात कवी कविता वाचत असताना सोबतचा सहकारी त्यातल्या काही ओळी पुन्हा पुन्हा उच्चारत जातो. मूळ कविता सुरू राहते त्या पुनरुच्चाराच्या पार्श्वभूमीवर असंही एक सादरीकरण झालं. अखेरच्या दिवशी एका कवितेवर कवीच्या कवितावाचनासोबत एक न्यूड सादरीकरण झालं. उपस्थित श्रोत्यांनी अत्यंत जबाबदारीने ते पाहून त्याला दाद दिली. भारतीय मानसिकतेत ते न बसणारं होतं. हे सादरीकरण करण्याचं प्रयोजन होतं की नाही हा प्रश्न बाजूला ठेवूनही हे सादरीकरण करण्याचं धारिष्ट्य आणि ते जबाबदारीने पाहण्याची परिपक्वता त्या प्रसंगी दिसून आली.

सामाजिकता आणि भावनिकता ही आपल्या आजच्या भारतीय कवितेची दोन शक्तिकेंद्रं आहेत. मात्र युरोपियन मानसिकतेशी आणि तिथल्या समकालीन कवितेशी तुलना करता, आपल्या कवितेला केवळ भाषिक प्रयोगाच्या अंगानेच नव्हे तर तत्त्वज्ञानात्मक अंगानेही वाढ होण्यास बराच वाव आहे, हे जाणवतं. अनुभव घेण्यात आपण विज्ञानाबाबतच्या सजगतेच्या संदर्भातही अनभिज्ञ आहोत, असंही जाणवतं. सूक्ष्म विज्ञाननिष्ठ गोष्टींचा अंतर्भाव आपल्या कवितेत सहजपणे होत नाही. फारच थोड्या प्रमाणात भारतीय कविता भाषांतरित होऊन परदेशात पोहचू शकते आहे. भारतीय कविता चांगली असूनही तिचा जागतिक कवितेसोबत अजून कस लागत नाही. तो जेव्हा लागेल तेव्हाच आपलं नाणं शंभर नंबरी सोन्याचं आहे काय, ते कळू शकेल. भारतीय कवितेला नोबेल पुरस्कार मिळून शंभर वर्षं लोटल्यावर तरी आपण हा विचार करायलाच हवा!

maharashtratimes.indiatimes.com, 8.12.2013.


Viac fotografií (34)
Ars Poetica 2013

Vytlačiť stránku Vytlačiť stránkupublikované 08. 12. 2013

Novinky > Súvisiace

Započúvajte sa do magických zvukov svetovej p...Započúvajte sa do magických zvukov svetovej p...
Pozrite si krátky dokument z medzinárodného festivalu poézie Ars Poetica 2018 a započúvajte...
Poetka Renate Aichinger o festivale Ars Poeti...Poetka Renate Aichinger o festivale Ars Poeti...
Rakúska poetka Renate Aichinger nám napísala nádherný list! Ďakujeme :) * Ars Poetica...
Ohlasy na Festival Ars Poetica 2018Ohlasy na Festival Ars Poetica 2018
Carmien Michels, Olivier Brossard, Mila Haugová, Risto Ahti, Lukasz Jarosz, Pietro Cagni ... Ďakujeme...
The Sound Of Human Thoughts / Ars Poetica 201...The Sound Of Human Thoughts / Ars Poetica 201...
V aktuálnom čísle Knižnej revue nájdete reportáž Lindy Nagyovej z medzinárodného festivalu...
Roberta Štěpánková, Artist and Psychotherapis...Roberta Štěpánková, Artist and Psychotherapis...
We're bringing you a profile of the artist and psychotherapist Roberta Štěpánková, who led...
The Story Behind The Ars Poetica 2018 Key Vis...The Story Behind The Ars Poetica 2018 Key Vis...
Meet Dorota Sadovská, the artist behind the Ars Poetica 2018 visuals. The concept of the poster...
CalmCube2 CMS
RSSVytlačiť stránkuKonverzný kurz 1 € = 30,1260 Sk · Mapa stránok · © 2014 - 2019 ArsPoetica